धाविर महाराजांचा पालखी सोहळा

रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना
। धाटाव-रोहा । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज यांच्या पालखी सोहळ्यास शनिवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने रोह्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती.
या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली. कोरोना पार्श्‍वभूमीवर निर्बंध थोडे शिथील करण्यात आले असल्याने यंदा सलामीसोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आ.अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी यशवंतराव माने,उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, मकरंद बारटक्के, शैलेश कोळी, भुषण भादेकर, संतोष पोटफोड़े, मधुकर पाटील, विजय मोरे, आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version