जोगेश्‍वरी मातेचा पालखी सोहळा

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी माता व भैरवनाथ महाराजांचा चैत्र पालखी सोहळा बुधवार दि.24 एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सर्व ग्रामस्थांना व भाविकांना श्री जोगेश्‍वरी मातेचे दर्शन आपल्या घराजवळ होणार आहे. मात्र, असे असले तरी काही वर्षांपासून पालखी सोहळा पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागत असल्याने सर्वत्र एक चुकीचा संदेश जात असून वेगळी चर्चा होतांना दिसते. त्यामुळेच ग्रामदेवतांची पालखी लवकरात लवकर व नियोजित वेळेत मंदिरात परतण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री जोगेश्‍वरी माता मंदिरात गुढीपाडवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भातील बैठकीत श्री जोगेश्‍वरी माता उत्सव समितीकडून करण्यात आले.

ग्रामदेवतांच्या पालखी सोहळ्यासाठी चाकरमानी, माहेरवासीन तसेच सगेसोयरे, पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने नागोठण्यात येत असतात. मुंबईकर मंडळी तर फक्त एखाद्या दिवसाची रजा घेऊन आलेले असतात. मात्र, त्यांना पालखीच्या दर्शनासाठी ताटकळत थांबावे लागते व त्यांची गैरसोय होते. काहीवेळा तर पालखी त्यांच्या घरापर्यंत नियोजित वेळेत न आल्याने त्यांना इतरत्र जाऊन पालखीचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळेचया बैठकीत ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी मातेच्या पालखी सोहळ्याची वेळ कमी करण्यासाठी व पालखी नियोजित वेळेत मंदिरात परतण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी अनेक सुचना केल्या.

Exit mobile version