गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

पॅलीएटिव्ह केअर सेवा आता गावपातळीपर्यंत; जिल्हा रुग्णालयासह सर्व आरोग्य केंद्रांत राखीव बेड

| रायगड | प्रतिनिधी |

गंभीर व असाध्य आजारांनी त्रस्त रुग्णांना सर्वसमावेशक, सुलभ आणि वेदनामुक्त आरोग्य सेवा मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने पॅलीएटिव्ह केअर सेवा गावपातळीपर्यंत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पॅलीएटिव्ह केअर सेवा टप्प्या-टप्प्याने उपलब्ध होणार आहे. जिल्हा रुग्णालयात किमान चार ते सहा बेड उपशामक काळजीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदू विकार, श्वसन विकार, मधुमेह आणि वृद्धापकाळातील गुंतागुंतीचे आजार अशा अनेक दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना सतत उपचार, वेदनाशमन आणि निगा आवश्यक असते. ग्रामीण भागातील रुग्णांना अशा उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असे. मात्र, आता सार्वत्रिक राज्य पॅलीएटिव्ह केअर कार्यक्रमामुळे ही सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 2 फेब्रुवारी रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला असून, पॅलीएटिव्ह केअरला ऐच्छिक नव्हे तर, अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या सेवेचा मुख्य उद्देश रुग्णांना आजाराच्या शेवटच्या टप्प्यातच नव्हे, तर आजाराचे निदान झाल्यापासून उपचाराच्या संपूर्ण कालावधीत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आधार देणे हा आहे. रुग्णांना घरपोच सेवा, सन्मानपूर्वक जीवनाची हमी आणि कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन देणे यावर या योजनेत भर देण्यात आला आहे.

रुग्णांना मिळणाऱ्या सेवा
शासन निर्णयानुसार पॅलीएटिव्ह केअर सेवा राज्य, जिल्हा, तालुका, प्राथमिक व समुदाय स्तरावर विकसित केली जाणार आहे. प्रशिक्षित आणि बहुविषयीक मनुष्यबळ तयार करणे, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा ठेवणे, जनजागृती करणे, रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि घरगुती सेवांना बळकटी देणे या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
गाव पातळीवर पोहोचणार सेवा
या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधे थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ही औषधे लिहून देऊ शकतील. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेदना नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही.
जिल्हा पॅलीएटिव्ह केअर समितीची भूमिका
नॅशनल प्रोग्रॅम फॉर पॅलीएटिव्ह केअर अंतर्गत जिल्हा पॅलीएटिव्ह केअर समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती कर्करोग, अवयव निकामी होणे यांसारख्या जीवघेण्या किंवा असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदनामुक्त आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी आवश्यक सेवा घरी किंवा आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे.
वेळेत उपचार मिळण्यास मदत
पॅलीएटिव्ह केअर सेवा अंतिम अवस्थेपुरती मर्यादित न ठेवता आजाराच्या सुरुवातीपासून उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल. यामुळे रुग्णांचा वेळ, प्रवासाचा खर्च वाचेल आणि वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होईल. गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी केले आहे.

गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी पॅलीएटिव्ह केअर सेवा ही दिलासादायक ठरणारी आहे. यामुळे अशा रुग्णांना ग्रामीण स्तरावरदेखील वेळेत व योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावरल शासकीय रुग्णालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Exit mobile version