नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या


खालापुरातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
| वावोशी | वार्ताहर |
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिके आणि भाजीपाला पिकांचे पंचनामे त्वरित करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था खालापूर व शेतकरी बांधवांच्या वतीने खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी व तालुका कृषी अधिकारी खालापूर यांना निवेदन देण्यात आले.

मागील दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भाताची रोपवाटिका व भात पिकाच्या पुनर्लागवड केलेल्या क्षेत्राचे आणि भाजीपाला क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या नुकसानग्रस्त पिकाची व क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच, मागील खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याची नुकसान भरपाई रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. त्यासंदर्भात पाठपुरावा करावा, ही विनंती देखील करण्यात आली.

यावेळी वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था खालापूर तालुका यांच्यामार्फत संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील, प्रगतशील शेतकरी व सल्लागार खंडू शिवराम पाटील, माजी तालुका अध्यक्ष मंगेश धामणसे, उपाध्यक्ष राजेश मोरे, सहसचिव विजय वाघमारे, सदस्या अर्पिता अमित पाटील, कृष्णा पाटील, साधुराम धामणसे, जयदास घोंगे, यशवंत आईत, जयंता पांगारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version