फळ बागांचे त्वरीत पंचनामे व्हावेत

| पेण | प्रतिनिधी |
अवकाळी पावसाने पेण तालुक्यातील आंबा, जांभूळ, रांझन, काजू यासह रानमेवा झोडपून काढल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोकणात भातानंतर आश्‍वासक पीक म्हणून आंबा काजूकडे पाहायला जाते. मात्र, दोन दिवसापूर्वी पडलेला पाउस आणि आज पडलेला मुसळधार पाउस याचा विचार करता आंब्याचे पीक पूर्ण नेसतानाभूत झालेले आहे. शेतकरी आपली फळ झाड जीवापाड जपून ऑक्टोंबर महिन्यापासून फवारणीला सुरुवात करतो. त्यानंतर झाडांना पोषक असे वेगवेगळे टॉनीक खत पूरवली जातात. जेणेकरुन आलेला मोहर गळून जाउ नये पकडलेली फळे गळून पडू नयेत. मात्र, या अवकाळी पावसाने छोटी-छोटी झाडाला लागलेली फळे पूर्णताः गळून पडली आहेत.

जी काही फळ झाडांवर राहणार आहेत. त्यांना देखील कीड लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पूर्णताः पेण तालुक्यातील बागायतदार हवालदिल झाला आहे. शासनाने युध्दपातळीवर या फळ बागांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याविषयी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आहे की, पेण तालुक्यातील फळबागा तसेच भाजीपाल्यांचे तातडीने पंचनामे करायला सांगितले आहेत. तसेच शेतकर्‍यांनी देखील तलाठयांशी संपर्क करुन पंचनामे झाले नसल्यास, नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करुन घ्यावेत.

माझी साठ आंब्याची झाडे पूर्ण मोहरून काही ठिकाणी फळ देखील धरले होते. परंतू, दोन दिवसापूर्वी आणि आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण झाडे झोडपून काढलेली आहेत. त्यामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तरी शासनाने पंचनामे करुन तातडीने भरपाई दयावी

अमित पाटील

Exit mobile version