पेण तालुक्यात पंचनाम्यांना सुरूवात

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यात बुधवारी झालेल्या ढगफुटीमुळे गडब, डोलवी, कांदळे, कांदळेपाडा, रोडा, निधवळी, गागोदे, करोटी, कासु, पाबळखोरे, खारेपाट, या भागांमध्ये शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे.

पेण तहसील कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात 2671.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महसूल खात्याकडून युध्द पातळीवर पंचनाम्याना सुरुवात झाली आहे. याकडे नायब तहसिलदार प्रसाद कालेकर व नितिन परदेशी हे वैयक्तीक लक्ष देत आहेत.

गडब, रोडे, कांदळे या गावांना लागुन असलेल्या डोंगरावर ढगफुटी झाल्याने विजांच्या कडकडाने पावसाला सुरुवात झाली आणि अशरक्षः ज्या भागात ढगफुटी झाली त्या गावांना पावसाने झोडपुन काढले. कित्येक घरांमध्ये पाणी शिरले. घरातील जीवनावश्यक वस्तु भिजल्या. पेण शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी जाऊन लाखोंचे नुकसान झाले. पेण तालुक्यातील भाल येथील देवीदास म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून सर्व इलेक्ट्रानिक वस्तू निकामी झाल्या. देवीदास म्हात्रे व त्यांच्या पत्नीचे नशीब बलवत्तर म्हणून त्या थोडक्यात बचावल्या.

जे पंचनामे केले आहेत. त्यामध्ये पेण शहरातील कोंबडपाडा परिसरात तीन घरात पाणी शिरुन मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कांदळेगावातील सुशील अंबाजी भोईर यांचे घर अंशतःपडल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जिते येथील कुसुम रामचंद्र गावंड यांच्या घराचे नुकसान झाले.
खरोशी येथील गोरखशनाथ पांडुरंग घरत यांच्या घराचे नुकसान झाले. आघई येथील रामा कानुवीर यांचे घर पडले आहे; तर शेडाशे येथील रघुनाथ जानु कातकरी यांचे देखील घर पडले. करोटी येथील गोविंद मारुती सकपाल आणि बेंडी भिवा वाघमारे यांचे देखील घर अंशतः पडले; तर गडब डोलवी गावांमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले.

पेण तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. जर कुणाचे नुकसान झाले असेल आणि पंचनामे नसतील तर तेथील तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पेण तहसील कार्यालयाने केले आहे.

Exit mobile version