पंढरीत विठूनामाचा जयघोष

पंढरपूर | प्रतिनिधी |
तब्बल दोन वर्षानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात विठूनामाचा जयघोष घुमू लागला असून,हातात टाळ,चिपळ्या आणि गळ्यात वीणा घेत विठ्ठलाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकर्‍यांमुळे अवघी पंढरी विठूमय झालेली आहे.सोमवारी (15 नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीचा अनुपम सोहळा साजरा होत असून,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात येणार आहे.

2 लाख वारकरी दाखल
दोन वर्षांनंतर भरत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. सुमारे दोन लाखांवर भाविक शहरात दाखल झाले आहेत. भक्तिसागर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर तसेच मठ, संस्थाने आदी भाविकांनी गजबजून गेले आहे. दर्शन रांग स्कायवॉकवरून सारडा भवनच्या पुढे गेली असून, दर्शन रांगेत 50 हजार भाविक दाखल झाले आहेत.

वॉटरप्रूफ दर्शन रांग
कार्तिकी यात्रेसाठी येणारे भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले असतात. भाविकांसाठी मंदिर समितीकडून स्काय वॉकच्या पुढून ते पत्राशेड येथील 10 दर्शन मंडप ते गोपाळपूर या दरम्यान वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आलेली आहे. तर दर्शन रांगेत मॅट अंथरण्यात आले आहे. त्याचबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद होते. त्यामुळे भाविक पंढरपुरात आले नव्हते. यात्रेची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाकडून पंढरपुरात संचारबंदी लागू करीत चैत्री, कार्तिकी, माघी व आषाढी यात्रा केवळ मोजकेच पुजारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने साजरी केल्या होत्या. शिवाय या यात्रांमध्ये भाविकांना रोखण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. वारकर्यांना पंढरपूरातच प्रवेश मिळाला नसल्याने वारकर्यांत नाराजी पसरली होती. तर गेले दोन वर्षे मंदिर बंद राहिल्याने भाविकांअभावी पंढरी नगरी सुनीसुनी भासत होती.
मात्र, घटस्थापनेला विठ्ठल मंदिर भाविकांना र्दानाकरीता खुले करण्यात आले. सद्या कार्तिकी यात्रा भविण्यात आली आहे. त्यामूळे गेल्या दोन वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनापासून वंचित राहिलेल्या भाविकांनी कार्तिकी यात्रेला हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version