| पेझारी | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्त्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन दि.24 व 25 जून रोजी करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचे दर्शन घेण्याची योजना आखण्यात आली. कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.24) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेकापच्या प्रवक्ता तथा महाराष्ट्र मिडीया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत पेझारी येथील चेक पोस्ट पक्ष कचेरी कार्यालयापासून या दौऱ्याची सुरुवात केली.
पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचे दर्शन घेण्यासाठी 24 व 25 जून रोजी शेकाप कार्यकर्त्यांच्यावतीने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पेझारी येथील चेक पोस्ट पक्ष कचेरी कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून विठू नामाच्या गजरात दौऱ्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी शेकापच्या प्रवक्ता तथा महाराष्ट्र मिडीया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, जशी तुमची शेकापच्या लाल बावट्यावर श्रद्धा आहे, तीच श्रद्धा पांडुरंगावर ठेवलेली आहात. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. शेकापचा कार्यकर्ता जसा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतो, तसाच तो पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेकाप कार्यकर्त्यांची ही पंढरीची वारी. तुमचा ज्ञानेश्वर माऊली पालखी दर्शन सोहळा यशस्वी होवो, अशा शुभेच्छा देखील चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केल्या.






