पंढरपूर वारीचा जागतिक गौरव!

‌‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स‌’मध्ये माहितीपट भारताचा राष्ट्रीय विजेता

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीवर आधारित ‌‘पंढरपूर वारी इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स‌’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‌‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026‌’मध्ये ‌‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम‌’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. या यशामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तिपरंपरेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त निर्मितीतून हा 22 मिनिटांचा इंग्रजी माहितीपट तयार करण्यात आला आहे. यात वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य, संतपरंपरेचे योगदान आणि वारीमागील आध्यात्मिक विचार मांडण्यात आले आहेत. डिस्कव्हरीच्या विविध वाहिन्यांवरून या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूरची वारी जात, धर्म आणि गरीब-श्रीमंत असा भेद विसरून सर्वांना भक्तिरंगात एकत्र आणणारी महान परंपरा आहे. या परंपरेचा विचार जगभर पोहोचविणाऱ्या माहितीपटाला राष्ट्रीय विजेत्याचा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांनी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version