पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे आमरण उपोषण सुरूच
| पेण | प्रतिनिधी |
पूर्वी सरकारचे धोरण होते की, कालवे करायचे. ते बदलून बंद पाइपने पाणी देण्याच्या योजना पुढे आल्या. त्याही रखडलेल्या आहेत. वाशी नाक्यावर पाईप पडून ते खराब झाले असल्याचे दिसून येत आहेत. त्यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून 38 कोटी मंजूर झाले होते. ती योजनाही रखडली आहे. पेण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.जयंत पाटील विधान परिषदेत लक्षवेधी मांडून खारेपाटातील पाणी प्रश्न सोडवायला सरकारला भाग पाडतील, असा विश्वास माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला. वाशी येथे पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे आमरण उपोषणस्थळी त्यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. पेणमधील विविध प्रश्नांबाबत पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे आमरण उपोषण सुरु केले आहे.
यावेळी पंडीत पाटील यांनी नंदा म्हात्रे, हेमंत पाटील, जितेंद्र ठाकूर, अभि म्हात्रे, दिलीप म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, अश्विनी ठाकूर, अजित पाटील या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्यासह बंड्याशेठ म्हात्रे, राजन झेमसे, नितीन पाटील, अशोक मढवी, नंदू मोकल, निवृत्त पोलीस अविनाश म्हात्रे, जेष्ठ पत्रकार विजय मोकल, प्रकाश माळी, विनायक पाटील, रुपेश गोडीवले व इतर अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
रायगड जिल्ह्यातील जमिनी शेतकऱ्यांकडे न राहता भांडवलदारांकडे जायला पाहिजे, हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे येथील प्रगतीकडे दुर्लक्ष होत आहे. पेण तालुक्यातील शेतीला पाणी मिळावे, यासाठी धरण बांधले. परंतु धरणाचे पाणी स्थानिकांना न मिळता नवी मुंबईला जात आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नाहीच पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. काखेत कळसा गावाला वळसा अशी अवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. या विभागात पाणी नसल्याने येथील नागरिक पेणमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे गावे ओस पडत आहेत.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली उपोषणकर्ते चंद्रहास म्हात्रे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. हेटवणे इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण सोडण्याबाबत पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले.