| अलिबाग | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या तथा माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले आहे. या घटनेमुळे शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या वाढदिवसाचा अभीष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार पंडित पाटील यांचा 1 मे रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी पंडित पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या पेझारी येथील निवासस्थानी, तसेच जिल्हाभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हजारोंच्या संख्येने रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक पंडित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येत असतात. परंतु, महिनाभरापूर्वीच शेकापच्या ज्येष्ठ नेत्या तथा पंडित पाटील यांच्या भगिनी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा अभीष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. तरी, दि. 1 मे रोजी त्यांच्या निवासस्थानी कोणताही कार्यक्रम होणार नसल्याची नोंद कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी घ्यावी, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.