। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समितीची बैठक नुकतीच श्री खंडोबा मंदिर अलिबाग येथे राज्य अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मच्छिमारांची सद्य परिस्थिती आणि भेडसावणार्या समस्या यावर महत्त्वाची चर्चा यावेळी करण्यात आली. त्याच्या शासन दरबारी या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी कोळी समाज आणि मच्छिमार बांधवांच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करणारे मुरूड तालुक्यातील एकदरा येथील महादेव कोळी समाज अध्यक्ष तथा हनुमान मच्चीमार सह. सोसायटीचे विद्यमान चेअरमन पांडुरंग आगरकर, यांची मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पांडुरंग आगरकर हे बॉम्बे पोर्ट मधून यशस्वी सेवा बजावून सेवा निवृत्त झाले असून आता आपण कोळी बांधवांच्या उत्कर्षासाठी झटण्यासाठी सक्रिय झाल्याचे बोलताना आगरकर,यांनी सांगितले. या प्रसंगी सरचिटणीस किरण कोळी, चिटणीस उल्हास वाटकरे,पालघर जिल्हा समिती अध्यक्ष राजन मेहेर, रायगड जिल्हा मच्छिमार कृती समिती अध्यक्ष मनोहर बैले,सरचिटणीस संतोष पाटील आणि अन्य पदाधिकारी आणि कोळी बांधव उपस्थित होते.