| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच बालेकिल्यात एकनाथ शिंदे यांना जोर का झटका लागला आहे. त्यांचे विश्वासू मानले जाणारे शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा पक्षाची साथ सोडणार आहेत. एकनाथ शिंदे यांना हा धक्का शरद पवारांनी दिला आहे. पांडुरंग बरोरा हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 3 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह पांडुरंग बरोबर शरद पवार गटात प्रवेश करतील.
पांडुरंग बरोरा आणि कार्यकर्त्यांच्या 100 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेते दोन गट पडल्यानंतर 10 महिन्यांपूर्वी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता वर्ष राहिलेलं असताना त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. सध्या शहापूर विधानसभा मतदारसंघातून दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते अजित पवार गटात आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पांडुरंग बरोरा विरुद्ध दौलत दरोडा असं चित्र दिसू शकतं. शहापूरमधील बरोरा कुटुंब 1980 पासून शरद पवार यांच्यासोबत आहे.