बस थांब्यावर भीतीचे सावट

| पनवेल । वार्ताहर ।

खारघर हिरानंदानी बस थांबा अनेक महिन्यांपासून अंधारात आहे. या थांब्यालगतचे दिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवे नसल्यामुळे प्रवाशांना अंधारात बसची वाट बघावी लागत असल्याने महिला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील खारघर हिरानंदानी बस थांब्यावर मुंबई, पुणे, ठाणे तसेच कोकणासह राज्यातील विविध भागांतून ये-जा करणार्‍या प्रवाशांसाठी सोयीस्कर आहे. या थांब्यावर खासगी तसेच महामंडळाच्या सांगली, सातारा, औरंगाबाद, नांदेड, बीड येथे जाणार्‍या बसदेखील थांबत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी असते; मात्र पनवेलकडून सीबीडीकडे जाणार्‍या मार्गांवरील हिरानंदानी बस थांब्याजवळील पथदिवे काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या अंधारातच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

अपघाताची शक्यता
या थांब्यालगत असलेल्या हिरानंदानी पुलाखालीदेखील अंधार असल्याने रात्रीच्या वेळी गैरसोय होत आहे. तसेच भरधाव वेगाने येणार्‍या वाहनांना रात्रीच्या अंधारात थांब्यावरील प्रवासी दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासनाने बस थांब्यावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी खारघरवासीयांकडून होत आहे.

Exit mobile version