टाक्या ‘फुल्ल’ करण्याकडे कल; पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती व आंतरराष्ट्रीय तणावामुळे खनिज तेलाच्या किमती भडकल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, दरवाढीनंतरही शहरी व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. भविष्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, या भीतीने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये ‘पॅनिक बायिंग’ म्हणजेच भीतीपोटी खरेदी सुरू झाली असून, बहुतांश वाहनधारक आपल्या वाहनांच्या टाक्या फुल्ल करण्याला प्राधान्य देत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, आगामी काळात इंधनाचे दर आणखी गगनाला भिडतील किंवा साठा संपेल, अशी अफवा आणि भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. परिणामी, नेहमी शंभर-दोनशे रुपयांचे पेट्रोल भरणारे दुचाकीस्वार आणि कारचालक थेट टाकी फुल्ल करून घेत आहेत. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक पेट्रोल पंपांवरील साठा वेगाने संपत चालला आहे. मर्यादित साठ्यामुळे पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक झळकू लागले असून, अनेक वाहनधारकांना इंधनाविनाच माघारी फिरावे लागत आहे. याचा फटका रोजच्या प्रवाशांना आणि नोकरदारांना बसत आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना या नव्या दरवाढीमुळे आणि इंधन टंचाईच्या भीतीमुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहतूक व्यवस्थेवरही याचा अंशतः परिणाम दिसून येत आहे.
सध्या पेट्रोल पंपावर येणारे प्रत्येक वाहनधारक टाकी फुल्ल करून देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे पंपावरील उपलब्ध साठा अपेक्षेपेक्षा खूप आधीच संपत आहे. अचानक वाढलेल्या या मागणीमुळे साठा नियंत्रित करणे कठीण झाले असून, इतर सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल देणे अशक्य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगण्याची गरज आहे.
प्रवीण खाडे,
पेट्रोल पंप मालक, रासळ
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल संपेल, तसेच आणखी किमती वाढतील, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून लोक इंधन भरण्यासाठी गर्दी करत आहेत. बरेचजण थेट टाकी फल्ल करत आहेत. त्यामुळे सर्वांना इंधन पुरवठा करताना खूप ताण येत आहे. लोकांनी गरजेपुरतेच इंधन भरावे जेणेकरून इतरांनादेखील इंधन मिळू शकेल.
संदीप जाधव,
पेट्रोल पंप व्यवस्थापक, सुधागड
