| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. बिबट्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या एका गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सायगाव येथे घडली. बिबट्याचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
श्रीवर्धन हरिहरेश्वर मार्गावरती सायगाव डॅम रोड आहे. या रोडवरती कामत फार्म नावाचे एक रिसॉर्ट आहे. अमित कामत व मानसी कामत यांच्या मालकीच्या या रिसॉर्टमध्ये त्यांनी देशी गायी पाळलेल्या आहेत. बुधवारी रात्री एका बिबट्याने या ठिकाणी गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला करून तिच्या शरीराचे अनेक लचके तोडले. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे काम करणारी माणसे घटनास्थळी पोहोचली असता, त्यांना मृत अवस्थेत असलेली गाय आढळून आली.
बिबट्याच्या हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचे मालक अमित कामत यांचे म्हणणे आहे. यानंतर श्रीवर्धन येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या भागात अनेक रिसॉर्ट आहेत. त्या ठिकाणी मानवीवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. सदर रिसॉर्टवरती अनेक पर्यटक राहण्यासाठी नियमितपणे येत असतात. मात्र बिबट्याच्या हल्ल्यामुळे या परिसरामध्ये दहशत निर्माण झाल्याचे दिसून येते. याबाबत वनविभागाचे श्रीवर्धन येथील अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी संजय पांढरकमे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रयत्न होऊ शकला नाही. तरी वनविभागाने सदर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरामधील नागरिकांमधून केली जात आहे.