। सारळ । वार्ताहर ।
खारेपाट विभागात सध्या दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याची स्थिती आढळत आहे. रेवस अलिबाग रस्त्यावरील नियमित प्रवाशांना कुत्र्यांच्या झुंडीचा अनुभव येत असल्याने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून यावर तोडगा काढावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जास्तच वाढत चालला असल्याने सकाळी व रात्री घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन बाहेर पडावे लागत आहे. या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची काळाची गरज आहे. पण याबाबत कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. शहरात कुत्र्यांच्या संख्येवर आळा ठेवण्याची यंत्रणा कार्यरत असते. पण खेडेगावात याबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्याचाच परिणाम कुत्र्यांच्या संख्या वाढीवर होत आहे. बर्याच वेळेला हे कुत्रे झुंडीने फिरत असतात अशावेळी ते धोकादायक ही ठरू शकतात. रात्रीच्या व पहाटेच्यावेळी बाईकस्वराचा पाठलाग करतात. त्यामुळे नाहक अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मुळात कुत्र्यांच्या संख्या वाढीवर नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने मोहीम हाती घेऊन कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले तर ही समस्या पूर्णतः संपू शकेल.