| पनवेल | वार्ताहर |
परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2023 या पाच वर्षांत जवळपास 4 हजार 287 श्वानदंशाच्या घटना घडल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. तर, भटकी कुत्री हल्ले करत असल्याने जखमी होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे श्वानांच्या हल्ल्यांमुळे खारघरकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
खारघरमध्ये कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातून श्वानांना सहज खाद्य उपलब्ध होते. या शिवाय रात्रीच्या वेळी पदपथ, रस्त्यावरील बेकायदा चालणाऱ्या चायनीज गाड्या तसेच जागोजागी असा कचरा पडलेला असतो. त्यामुळे श्वानांची संख्या वाढत आहे. खारघर परिसरातील सोसायटी आणि रस्त्यावर नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारी दवाखान्यात श्वानदंश झालेले चार ते पाच रुग्ण दिवसभरात येत असल्याची माहिती आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच, जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2023 या पाच वर्षात जवळपास 287 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. खारघर परिसरातील श्वानांचे सर्वेक्षणही महापालिकेकडून करण्यात आले नसल्याने ही समस्या अधिक वाढली आहे.
श्वानदंशाच्या प्रमुख घटना सेक्टर आठमध्ये दहा वर्षाच्या मुलांसह शांती निकेतन सोसायटीत दोन भटक्या कुत्र्यांनी जवळपास 27 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. तर तळोजा सेक्टर दहा मधील कैलास अपार्टमेंट, अर्चिड सोसायटी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुरक्षा रक्षकासह आठ ते दहा व्यक्तींचा चावा घेतला होता.
खारघरमध्ये पाच वर्षांत 4 हजार 287 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. तसेच खारघर, तळोजा परिसरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरणाबरोबर लसीकरण पालिकेकडून केले जात आहे.
डॉ. बी.एन.गीते,
पशुधन विकास अधिकारी, पनवेल महापालिका