पाणजे पाणथळ बचाव अभियानाला नवे वळण

मासेमारी क्षेत्र असल्याची सिडकोची कबुली; 289 हेक्टर आंतरभरती क्षेत्राचे संवर्धन करण्याची मागणी

। उरण । वार्ताहर ।


उरण येथील पाणजे पाणथळ क्षेत्राला वाचवण्याच्या अभियानात एक नवीन वळण लागले आहे. 289 हेक्टर विस्ताराचा जैववैविध्याने समृद्ध असलेला हा भाग मासेमारी क्षेत्र असल्याची सिडकोने कबुली दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई सेझसाठी हे स्थळ भाडेतत्वावर देण्यावर आता नवीन प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाला आहे.

सिडकोच्या उरण बायपास मार्गाच्या उभारणीमुळे येथील मासेमारीवर चरितार्थाच्या स्त्रोतावर विपरीत परिणाम होत असल्याची याचिका उरणच्या मच्छिमारांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याप्रकरणी सुनावणी दरम्यान शपथपत्रामध्येच सिडकोने या तक्रारीचे खंडन करत हे क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. सिडकोचे कार्यकारी अभियंता हणमंत नहाने यांनी आपल्या शपथपत्रात पाणजे-डोंगरी विस्तार क्षेत्र हे मासेमारी क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. तसेच नहाने यांनी पाणजे धारण तळ्याचे फोटो सादर करत हे पाणथळ क्षेत्र मासेमारी क्षेत्र असल्याचे सांगत प्रभाग सुरक्षित असल्याच्या सिडकोच्या दाव्याचे समर्थन केले आहे.

सिडकोने दिलेली ही अतिशय महत्वपूर्ण मान्यता असून आता नवी मुंबई सेझने बेकायदेशीरपणे बंद केलेले मासेमारी क्षेत्र पुनर्संग्रहित करणे सिडकोचे कर्तव्य आहे, असे पारंपारिक मच्छिमार बचाओ कृती समितीचे दिलीप कोळी यांचे म्हणणे आहे. तसेच दिलीप कोळी आणि पारंपारिक मच्छिमार बचाओ कृती समितीचे प्रतिनिधित्व करणार्‍या इतरांच्या याचिकेमध्ये कांदळवने, दलदली, बोटींच्या देखभालीचे क्षेत्र आणि लँडिंग सेंटरच्या क्षतीसाठी भरपाईची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. झमन अली यांनी दिली.

नवी मुंबई सेझच्या सुरक्षा यंत्रणांनी बीएनएचएसचे या ठिकाणी सुरू केलेले संशोधन बंद केले आहे. राज्य शासनाला पाणजेला मासेमारी क्षेत्र म्हणून पुनर्संग्रहित करण्याचे आणि भावी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी धोकादायक ठरू शकणारा भाग म्हणून पक्षांच्या उड्डाणाचा अभ्यास करणे बीएनएचएसला सुरु ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंतीही शासनाला केली असल्याची माहिती नंदकुमार पवार आणि बी.एन. कुमार यांनी दिली आहे.

Exit mobile version