भारत-आफ्रिका यांच्यात दूसरा सामना; मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. स्वत: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. त्यामुळे गिलच्या अनुपस्थितीत डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत भारताचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने भारतावर 30 धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शनिवार (दि.22) नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे दुसरी कसोटी रंगणार आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने गिलला दुखापत झाली. पहिल्या डावात अवघ्या 4 धावा केल्यावर गिल रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. तो दुसऱ्या डावातही फलंदाजीस आला नाही. गिल सध्या गुवाहाटीला दाखल झाला असला, तरी बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने त्याला जोखीम न पत्करण्याचे आदेश दिले आहेत, असे समजते.
गिलच्या प्रकृतीत नक्कीच सुधारणा होत आहे. मात्र शुक्रवारी त्याची अंतिम चाचणी घेण्यात येईल. संघाचे फिजिओ व वैद्यकीय फळी गिलच्या तंदुरुस्तीविषयी अंतिम निर्णय घेईल. गिलच्या अनुपस्थितीत एका युवा खेळाडूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल. सुदर्शन किंवा जुरेलपैकी एकाला खेळवण्यासह नितीश रेड्डीलाही संघात स्थान देण्याचा पर्याय आहे. गिल नसल्यास पंत कर्णधारपद बजावण्यासाठी सज्ज आहे, असेही कोटक यांनी नमूद केले. त्यामुळे 28 वर्षीय पंत भारताचा 38 वा कसोटी कर्णधार बनू शकतो.
फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण दक्षिण आफ्रिकेने 124 धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर 30 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. 2010 म्हणजे 15 वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष. आफ्रिकेचा
संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता.
या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय व 5 लढतींची टी-20 मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून 2026 मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांच्यापुढे दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना गुवाहटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत करणार आहे. शुभमन गिलला या सामन्यातून बाहेर पडला आहे. आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने शुक्रवारी कबूल केले की एकाच कसोटीत नेतृत्व करणे ही सर्वोत्तम भूमिका नसली शनिवारपासून येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील कठीण आव्हानांवर तो जास्त लक्ष केंद्रित करत नाही. ईडन गार्डन्स कसोटी दरम्यान मानेच्या गंभीर दुखापतीमुळे नियमित कर्णधार शुभमन गिलला संघाबाहेर पडला आहे. त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले, त्यानंतर संघ व्यवस्थापनाने पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
कर्णधारासाठी एकच सामना हा सर्वोत्तम पर्याय नाही, परंतु हा सन्मान दिल्याबद्दल तो बीसीसीआयचे आभार मानतो. कधीकधी, जर तुम्ही एखाद्या मोठ्या संधीबद्दल जास्त विचार केला तर त्याचा काही उपयोग होत नाही. मला त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. पहिली कसोटी आमच्यासाठी कठीण गेली आणि आम्ही कसोटी जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणार आहोत.
– ऋषभ पंत
