शुभेच्छा फलकांनी शहर विद्रूप

पालिका प्रशासन हतबल
न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत कारवाईचा इशारा

। पनवेल । वार्ताहर ।

पाच वर्षे होऊनही कोणतेही जाहिरात धोरण न राबवल्याने पनवेल शहर शुभेच्छा फलकांनी गजबजले आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानात चांगली कामगिरी करण्याचा दावा करणारे पालिका प्रशासन डोळ्यासमोर दिसत असूनही या बेकायदा फलकांवर कारवाई करीत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने नुकतेच एक जाहीर आवाहन करीत आपली हतबलता स्पष्ट केली आहे. प्रशासनाने शहरातील नागरिक, व्यावसायिक तसेच आस्थापनांना याद्वारे आवाहन केले आहे. यात सार्वजनिक, खासगी जागेवर, इमारतींवर तसेच विद्युत पोलवर लावण्यात आलेले बेकायदा फलक काढून घेण्याचे आवाहन केले आहे. उच्च न्यायालयातील जनहित याचिकांचा दाखला देत कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र कोणत्या प्रकारची कारवाई करणार असे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील हे फलक निघणार कसे, असा सवालही पनवेलकर करीत आहेत.


इतर महापालिकांत शहरात असे फलक लावायचे असतील तर एक जाहिरात धोरण आहे. यात यासाठीच्या अधिकृत जागाही ठरवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी दर आकारणी करून पालिका फलक लावण्याची अधिकृत परवानगी देते व इतर ठिकाणी फलक लावल्यास त्यावर कारवाई करते. मात्र पनवेल पालिकेकडे तसे धोरण नसल्याने त्यांना न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत कारवाईचा इशारा द्यावा लागला आहे.पालिका प्रशासनाने यासाठी राजकीय पक्ष व नागरिकांना पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुळात राजकीय पक्षांचेच फलक शहरात अधिक प्रमाणात झळकत आहेत. त्यामुळे ते सहकार्य काय करणार, हा प्रश्‍न आहे.

नागरिकांना आवाहन
पालिका प्रशासनाने या पत्रकाद्वारे नागरिकांना आपल्या परिसरात असे फलक लागले असतील तर नावानिशी किंवा निनावी तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. यासाठी 9769012012 या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सपवर छायाचित्रासह तक्रार करावी. पालिकेच्या टोल फ्री क्रमांक 1800227701 यावर आणि 022- 7458040, 41, 42 यावर तक्रारी करता येईल असे पत्रकात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे बेकायदा फलकांविरोधात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी हे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे. पालिका बेकायदा फलक उतरविण्याची कारवाई करतेच आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने टोल फ्री नंबर व संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत.

कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल पालिका
Exit mobile version