। पनवेल । वार्ताहर ।
महापालिकेतील विविध विभागातील दंड, कराच्या पावत्या आता शंभर टक्के फक्त पॉस मशीनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. छापील पावती पुस्तके पुर्णत: बंद करण्यात आली असून, पारदर्शक कारभाराच्या दिशेने महापालिकेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. मंगळवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत पॉस मशीनचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्तांनी महापालिकेतील पावती पुस्तकांचा वापर बंद करून पॉस मशीनच्या माध्यमातून दंड, कर वसुली करावी याकडे जातीने लक्ष घातले होते. आयुक्तांनी सातत्याने यामध्ये येणार्या त्रुटींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करून प्रोत्सहन दिले. यासाठी महापालिकेला बँक ऑफ इंडियाचे सहकार्य लाभले असून, वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 88 पॉस मशीन्सचा माध्यमातून सर्व कर व दंड वसुली चारही प्रभाग समितीमध्ये केली जात आहे. लेखा विभागाच्या या स्तुत्य कामगिरीबद्दल मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे व लेखा विभागाच्या संपूर्ण टिमचे आयुक्तांनी अभिनंदन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा परिक्षक विनयकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.






