पनवेल मनपाचे 783 कोटींचे बजेट मंजूर

महासभेत मंजूर,मुलभूत सुविधांवर तरतूद
पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा 783 कोटींचा अर्थसंकल्प आज महासभेसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला महासभेने मंजूरी दिली. या बजेटमधून महानगरातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.30 नोव्हेंबर) विशेष सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे घेण्यात आली .
स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी यांनी 783 कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प महासभेपुढे सादर केला. या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असून मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे यांनी जमा व खर्चाचा अंदाजानूसार अर्थसंकल्पातील ठळक बाबीं सभेपुढे मांडल्या.
यावेळी अर्थसंकल्पावरील नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या. या सूचना येत्या दोन दिवसात लेखी स्वरूपात देण्यात याव्या असे महापौरांनी सांगितले. 1 ऑक्टोबर 2016 ला स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिका पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिकेने 2020-2021 मध्ये शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहे तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सुचविण्यात आली नाही. पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने या अंदाजपत्रकात घेतले आहेत. याचबरोबर पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणारी उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा यांची विकास कामे हाती घेतली जाणार आहे.

Exit mobile version