पनवेल एक्झिटचे काम अंतिम टप्प्यात

वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची नव्याने सुधारणा करण्यात येत आहे. त्यासाठी कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट मंगळवार, 11 फेब्रुवारीपासून सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. सध्या येथील काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार असून, यापूर्वी रस्ते जोडणीचे काम आता जलदगतीने सुरू झाले आहे. कळंबोली जंक्शनवर होत असणार्‍या वाहतूक कोंडीमधून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खोदकाम करायला सुरुवात केली असून, सर्व यंत्रणा जलदगतीने कामाला लावली आहे. पुलाचे पायाभरणीचे काम सुरू असून, जवळपास शंभर फाईल फाऊंडेशन म्हणजेच स्तंभ झाले आहेत. दरम्यान, एनएचएआय आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने, टीआयपीएल पनवेल यांच्यामार्फत हे काम सुरू आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (किमी 9.600) येथे डावीकडे वळण घेऊन एनएच 48 मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एग्झिट) येथून तळोजा, कल्याण-शिळफाट्याकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल-शीव महामार्गावरून पुरुषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एनएच 48 महामार्गावरून इच्छितस्थळी जाता येणार आहे.
काय होणार फायदे?
कळंबोली जंक्शन अपग्रेड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ते विकास महामंडळ नोडल एजन्सी असून याकरता केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून 770 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. यामुळे हे वाहतूक सिग्नल आणि ट्रॅफिक फ्री होणार आहे. त्यामुळे तासनतास वाहनांना अडकून पडावे लागणार नाही. क्रॉस कॉनफ्लेक्टसुद्धा दूर होणार आहे. परिणामी वेळ आणि इंधन वाचणार आहे.
Exit mobile version