| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील अग्रगण्य समजली जाणारे पत्रकारांची संघटना म्हणजेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच. नोंदणीकृत असणारी सदरची संस्था ही ॲक्टिव्ह पत्रकारांची संस्था म्हणून ओळखली जाते. बेधडक ज्येष्ठ पत्रकार विवेक मोरेश्वर पाटील यांनी नववर्षाच्या उंबरठ्यावर अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.नुकतीच शिर्डी येथे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली.यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या नूतन लोगोचे शिर्डी येथे अनावरण संपन्न झाले.
संपूर्ण वर्षातील कार्यक्रमांचा ढाचा आणि वेळापत्रक यावेळी मांडण्यात आले.तसेच यापूर्वीच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील,अविनाश कोळी आणि डॉ.संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाने विविध समाजोपयोगी कार्य करण्याच्या दृष्टीने सारे नियोजन करण्यात आले.अध्यक्ष विवेक पाटील यांनी विस्तृत अध्ययन करत आगामी प्रोजेक्ट सादर केले. या पूर्वी देखील पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. दुर्गम विभागातील शाळांना प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम, डिजिटल फलक, स्मार्ट लर्निग अशा यंत्रणा देखील पुरविण्यात आल्या आहेत.वह्या पुस्तके असे शैक्षणिक साहित्याचे नित्यनेयमाने वाटप होत असते. समाजातील गरीब गरजू व उपेक्षित घटकांना या संस्थेने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. असे असले तरी आगामी कार्यक्रम हे आगळे वेगळे आणि नाविन्याची कास धरणारे असतील असे अध्यक्ष विवेक पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. सदराच्या बैठकीला त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, माजी सरचिटणीस मंदार दोंदे, सदस्य राजेंद्र पाटील, सदस्य प्रवीण मोहोकर उपस्थित होते.
नवीन वर्षात आम्ही पँडल पत्रकार साहाय्यासाठी हा प्रॉजेक्ट घेऊन येत आहोत. एका अनोख्या सायकल स्पर्धेतून फिटेस्ट विल सर्व्हाईव! हा संदेश आम्ही देऊ इच्छितो तसेच यातून गरजवंत पत्रकार बांधवांसाठी सहाय्य यंत्रणा उभारण्याचा आमचा मानस आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन आम्ही माध्यमांना सदरच्या उपक्रमाबाबत अवगत करू.