आधुनिक स्थानके सज्ज
| पनवेल | प्रतिनिधी ।
मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कला नवी लाईफलाईन ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) 2.782 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच या मार्गांवरील परचालनाची उलटी गिनती सुरू होणार आहे.
या नव्या रेल्वे मार्गामुळे कल्याण मार्गावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होणार असून, नवी मुंबई, रायगड आणि कर्जत दरम्यानच्या रेल्वे संपर्काला नवी गती मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प 3 अंतर्गत 29.6 किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे.
एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक सर्व जमीन संपादन पूर्ण झाले असून, वन विभागासह विविध यंत्रणांकडून आवश्यक मंजुरी मिळाल्या आहेत. प्रमुख नागरी कामांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत नऊ मोठे पूल, 35 लहान पूल, 16 अंडरब्रिज, पाच उड्डाणपूल, तीन बोगदे तसेच कर्जत रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, मोहापे आणि किरावली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
ट्रॅक जोडणीचे काम अंतिम टप्प्यात
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रेल्वे मार्ग जोडणीचे काम अवळपास पूर्ण झाले आहे. सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणेची उभारणीही प्रगत अवस्थेत असून, मोहपे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठीच्या फॅक्टरी ॲक्सेष्टन्स टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना मिळणार पर्यायी मार्ग
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतदरम्यान स्वतंत्र उपनगरी रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कल्याण जंक्शनमार्गे वळसा घालण्याची गरज भासणार नाही. अधिक सोयीस्कर आणि पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने प्रवासाचा कालावधी कमी होण्याबरोबरच रेल्वेची वहनक्षमता वाढण्यास आणि उपनगरी रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
निवासी आणि औद्योगिक विकासाला चालना
नवी मुंबई, कर्जत आणि परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या निवासी तसेच औद्योगिक क्षेत्रांना या कॉरिडॉरमुळे मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
