गणेशोत्सवासाठी पनवेल बाजारपेठ फुलली

पनवेल । वार्ताहर ।
गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, खांदेश्‍वर शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली होती. गणेशोत्सवापूर्वी शेवटचा रविवार असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे पनवेलमधील मुख्य मार्केटला येणारे रस्ते, मिरची गल्ली, शिवाजी रोड, टिळक रोड व इलेक्ट्रिकल वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनामुळे गेली दोन वर्षे उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या.

यंदा मात्र सर्व निर्बंध हटल्याने उत्सव जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील सजावट, तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची पावले मुख्य बाजारपेठांकडे वळली आहेत. यात पनवेल शहरासह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकदेखील खरेदीसाठी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी जोमात
बाप्पाच्या आरास रंगीबेरंगी प्रकाशाने झगमगाट करण्यासाठी भाविकांनी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत गर्दी केली होती. वेगवेगळ्या रंगांच्या माळा, रंगीबेरंगी कंदील, प्रकाशझोत मारणारे वेगवेगळे दिवे, छोटे झुंबर, इलेक्ट्रॉनिक समई व साऊंड या सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. फुलांची शंभर दिव्यांची माळ, मिक्स कलर फुलपाखरे, पाईपच्या माळा आदींची बाजारपेठेत मागणी आहे. फोकससाठी लागणारी विविध प्रकारचे बल्ब, गणपती बाप्पाच्या आकर्षक सजावटीसाठी छोट्या झुंबरलाही मोठी मागणी आहे.

गणेशोत्सवासाठी वस्त्रनगरी सज्ज लाडक्या बाप्पाचे स्वागत पारंपरिक पोशाख परिधान करण्याकडे अनेकांचा कल असतो. हा ट्रेंड लक्षात घेता बाजारपेठेमध्ये पारंपरिक पोशाखाची रेलचेल आहे. पुरुषांसाठी खास रंगीबेरंगी कुर्ते विक्रीसाठी आले आहेत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ते मुली-महिलांना घालता येतील अशा कुर्त्यांचे अनेक पर्याय दुकानांत उपलब्ध आहेत. महिलांसाठी काठापदराच्या साडीचे विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामध्ये शालू, घागरा, बनारसी सिल्क, पैठणी, गडवाल सिल्क, नल्ली सिल्क, खण साड्या असे प्रकार आकर्षण ठरत आहे.

Exit mobile version