पनवेल पालिकेच्यावतीने हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याचा निर्णय

हवा शुद्धीकरणाकडे पालिकेचे ठोस पाऊल

| पनवेल | दीपक घरत |

दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने हवा शुद्ध करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सायन-पनवेल महामार्गावरील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या कळंबोली सर्कल येथे ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

महानगराच्या दिशेने प्रवास होत असलेल्या पनवेल पालिका हद्दीचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच, विकास कामांमुळे हवेतील धुळीच्या प्रमाणात देखील वाढ होत असतानाच औद्योगीकरणामुळे हवेत होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन आरोग्य विषयी विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचा विचार करून हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून 10 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या पूर्वी देशातील तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये देखील या यंत्रनेचा उपयोग केला जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून, हवेची गुणवंत्ता वाढवण्यासाठी या यंत्रणेची मोठी मदत होणार असल्याचे मत अधिकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

यंत्रणा काम कशी करणार?
आकर्षक रचनेतील या यंत्रणेवर पाणी फवारण्यासाठी कारंजे बसवण्यात आले आहेत. तसेच, हवेतील कार्बन व धूळ खेचून घेत या यंत्रणेत पाण्याद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाईल. काही दिवसानंतर धूळ आणि कार्बनमुळे यंत्रणेत तयार झालेले लिचड साफ करण्यात येईल. आकर्षक रचनेतील या यंत्रणेत पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली 5 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. दररोज 400 लिटर पाण्याचा वापर त्यातून करण्यात येणार आहे.
यंत्रणा बसवण्याची प्रस्तावित ठिकाणे
प्रभाग समिती ‌‘अ'- खारघरमधील हिरानंदानी कॉम्पलेक्स व कोपरा गाव आणि तळोजा एमआईडीसीतील नावडे उपविभाग आईजीपीएल नाका व राणी लक्ष्मीबाई चौक.
प्रभाग समिती ‌‘ब'- कळंबोलीतील लेबर नाका व रोडपाली सिग्नल.
प्रभाग समिती ‌‘क'- कामोठे एन्ट्री पॉईंट व एमजीएम हॉस्पिटल समोर
प्रभाग समिती ‌‘ड'- पनेवल कोळीवाडा पार्कींग व हुतात्मा स्मारक गार्डन
Exit mobile version