| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना प्रमणापत्र प्रदान करण्यात आले.
खारपाडा टोल नाका ते वावंजे, धोदानी, शिरवली त्याचबरोबर खालापूर तालुक्याची सीमा असा मोठा भाग पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो. त्याचबरोबर ग्रामीण भाग देखील या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. त्यामुळे सहाजिकच येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी तालुका पोलिसांवर आहे. दरम्यान, असे असतानाही प्रत्येक आघाड्यांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावण्यात आले आहेत. या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यापैंकी त्याचे अन्वेषण आणि प्रकटीकरणाचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यात तालुका पोलिसांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यानुसार त्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. नवी मुंबईमध्ये सानपाडा पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.







