गांजा विक्रीप्रकरणी पनवेल पोलिसांची पुण्यात कारवाई

90 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त

। पनवेल । प्रतिनिधी ।

गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत गांजासह सुमारे 90 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी अभिमान अबू गुंजाळ (19) याची चौकशी केली. चौकशीत त्याने गांजा राहुल हारकळ याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे येथील संबंधित ठिकाणी तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी समीम मुत्तलीब शेख याच्याशी संबंधित ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित घर बंद असल्याचे आढळून आले. मात्र, घरामध्ये गांजा हा अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत व पंचांच्या साक्षीने घरझडती घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली. घर झडतीदरम्यान पोलिसांना सुमारे 60 हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. गांजा विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 90 हजार 990 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गांजा हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोपनी सुनील सरगर यांनी दाखल अधिकारी म्हणून काम पाहिले, तर पोपनी हजरत पठाण, पोहवा अविनाश गंथडे, अमोल पाटील, योगेश दिवेकर, पोशी शशिकांत काकड यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपींसह मुद्देमालाचा शोध घेतला आहे.

Exit mobile version