। पनवेल । वार्ताहर ।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पनवेल तालुका पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आदींच्या उपस्थितीमध्ये अधिकारी व कर्मचार्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशन ऑल आऊट राबवून त्यामध्ये प्रामुख्याने अंमली पदार्थविरूद्ध कारवाई, अंमली पदार्थाचे सेवन करणारे 02 इसमांवर कारवाई, एक लोखंडी धारदार घातक शस्त्र जप्त, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(ई) अन्वये एकूण 09 गुन्हे दाखल करून देशी, विदेशी व हातभट्टी दारू जप्त केली आहे, त्याचप्रमाणे कोपटा अॅक्ट अंतगर्त 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे बार वर कारवाई करून 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच, हद्दीतील गुंडांची तपासणी केली असता हिस्ट्रीशिटर 03 पैकी 03 मिळून आले. त्याचप्रमाणे गुंडा रजिस्टरमधील 19 पैकी 10 मिळून आले आहेत. तसेच प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे हद्दीकडे दोन ठिकाणी नाकाबंदी करून 31 वाहनांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 57 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.