पनवेलच्या रेशनिंग विभागाचा सर्व्हर वारंवार बंद

सोयीसुविधांअभावी नागरिकांची गैरसोय

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल तहसीलदार कार्यालयातील रेशनिंग व पुरवठा विभागात इंटरनेट सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मंगळवार आणि गुरुवारी रेशनिंगची विविध कामे होत असल्याने कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी उसळते.

रेशन कार्डावरील नाव कमी करणे, नवीन नाव समाविष्ट करणे, नवीन रेशन कार्ड काढणे, शिधापत्रिकेतील दुरुस्ती आदी सर्व प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र इंटरनेट सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने कामकाज दोन ते तीन तास ठप्प होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना ताटकळत उभे राहावे लागते.

कार्यालयाबाहेर नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था अपुरी असून, उन्हाळा किंवा दमट वातावरणात पुरेशा पंख्यांचीही सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढत आहे. अनेकदा रांगेत तासन्‌तास उभे राहूनही काम न झाल्याने नागरिकांना पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागते. मंगळवारी कधी कधी वीज वितरण मेंटेन्स करता शट डाउन घेते.

एकीकडे अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाला असून डिजिटल युगात विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र दुसरीकडे पनवेल तहसीलदार कार्यालयातील रेशनिंग विभागाचा इंटरनेट सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने प्रशासनाच्या डिजिटल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘विमानतळ सुरू झाला, पण रेशनिंग विभागाचा सर्व्हर जोरात कधी चालणार?’ असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांनी रेशनिंग विभागात उच्च क्षमतेची इंटरनेट सेवा, सक्षम सर्व्हर, पुरेशी बसण्याची व्यवस्था, पंखे आणि नागरिकाभिमुख सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Exit mobile version