| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल शहरात सध्या विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, या कामांदरम्यान योग्य नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ठेकेदारांकडून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक रस्ते बंद केले जात असल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे.
शहराच्या विविध भागांत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुरू असताना वाहनांची ये-जा बंद केली जाते, तर काही ठिकाणी खोदकाम केल्यानंतर काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, दुकानदार, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामात महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेचे लाल रंगाचे डीपी अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. ड्रेनेज लाईनचा मार्ग आणि डीपीची जागा यांचा ताळमेळ नसल्याने काही ठिकाणी काम थांबवावे लागत आहे. परिणामी, सुरू असलेले काम पुन्हा रखडते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर होत आहे. एकाच ठिकाणी काम पूर्ण करण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम सुरू केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्ते खोदून ठेवल्यानंतर काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. विशेषतः सकाळी कामावर जाणारे नोकरदार, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक त्रास होत आहे.
ड्रेनेजच्या कामांमुळे पनवेलकर हैराण
