। पनवेल । वार्ताहर ।
मार्च महिन्यापासून पनवेल तालुक्यात तीव्र पाणीटंचाई सुरू होते. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत पनवेल तालुक्यातील 50 गाव, वाड्या व वस्तींमध्ये पंधरा टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, पाऊस पडत असल्याने 28 जूनपासून पनवेल तालुका टँकरमुक्त झाला असल्याची माहिती पंचायत समिती पनवेलकडून देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतच्या अहवालानुसार टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला नसला तरीदेखील चांगल्या प्रकारे पाऊस कोसळत आहे. त्यामुळे टँकरने होणारा पाणीपुरवठा 28 जून पासून बंद करण्यात आला आहे. गत काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पनवेल तालुक्यातील सर्वाधिक 50 गाव वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यावरून पाण्याची किती टंचाई जाणवू लागली आहे हे समजेल. काही वर्षांपूर्वी पनवेलमधील मोजक्याच गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता पाणीटंचाईग्रस्त गावांनी अर्धशतक गाठले आहे.
कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने नद्या, विहिरींमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पाणी गेलेल्या बोरवेललादेखील पाणी आले आहे. सुरुवातीला 13 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर दोन टँकर वाढवण्यात आले. जून महिन्याच्या तिसर्या आठवड्यापासून काही गावातील टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर 28 जून पासून सर्वच 15 टँकर बंद करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने पाण्याचे हवे तसे नियोजन करण्यात आलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत असल्याने ठराविक काळानंतर बोअरवेलचे पाणी कमी होते. तर, आदिवासी बांधवांना कडी कपारीतून दोन-तीन किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावे लागते. काही ठिकाणी एमजेपी-सिडकोकडून पाणीपुरवठा होतो. मात्र, तोदेखील कमी आहे.