पनवेल होणार झोपडपट्टीमुक्त; मनपातर्फे 2600 घरांची निर्मिती

पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला नागरिकांना नोटीस उच्च न्यायालयाचा आदेश

| पनवेल | प्रतिनिधी |

प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 2 हजार 600 घरे बांधण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला याठिकाणी इमारती बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने झोपड्या रिकाम्या करण्यासाठी झोपडीधारकांना नोटीसा देण्यात आल्या. मात्र पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला येथील जनहित कल्याणकारी सोसासटीच्या वतीने महापालिकेच्या विरोधात मुंबई येथील उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. उच्च न्यायालयाने झोपडपट्टीधारकाने 30 सप्टेंबरपर्यंत झोपडी रिक्त करावी असे आदेश दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रत्येक झोपडी धारकाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत झोपडी रिक्त करण्याबाबत प्रतिज्ञा पत्र महापालिकेस दोन आठवड्याच्या आत देण्याचा आदेश देण्यात आला होता. पुन्हा नव्याने उच्च न्यायालयाला जनहित कल्याणकारी सोसासटीच्यावतीने केलेल्या विनंती अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करुन मा. उच्च न्यायालयाने ही मुदत अजुन 2 आठवडे वाढवून देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार प्रतिज्ञा पत्र सादर करण्याची मुदत 13 जुलैपासून पुढील 2 आठवडे वाढवून देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शासन निर्णय 9 डिसेंबर 2015, नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी योजनांमध्ये ङ्गसर्वांसाठी घरे 2022 ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुूसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका हद्दीतील झोपडीधारकांना पक्की घरे बांधून दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रातील वाल्मिकी नगर, महाकाली नगर, लक्ष्मी वसाहत, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, अशोकबाग, तक्का वसाहत या झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत पालिका हद्दीत 2 हजार 600 घरे बांधण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्याला 30 चौरस मीटरचे घर मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुर्नवसनाच्या 06 सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र व राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.

पनवेल होणार झोपडपट्टी मुक्त
या योजनेमुळे पनवेल महानगरपालिका झोपडपट्टी मुक्त होण्यास मदत होणार आहे.तसेच झोपडपट्टीधारकास इमारतीमध्ये स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे. 60 विविध झोपडपट्ट्यांमधील साडेआठ हजारांहून अधिक लाभार्थी राहत असल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. गेले तीन वर्ष अखेर पहिल्या टप्प्यात लक्ष्मी वसाहत, वाल्मिकी नगर, महाकाली नगर, कच्छी मोहल्ला, पटेल माहोल्ला या पाच झोपडपट्ट्याच्या पुर्नवसन योजनेला गती मिळाली आहे.

उच्च न्यायालयाने ही मुदत अजुन 2 आठवडे वाढवून देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार प्रतिज्ञा पत्र सादर करण्याची मुदत 13 जुलै पासून पुढील 2 आठवडे वाढवून देण्यात आलेली आहे.या कालावधीमध्ये हमी पत्र सादर न केल्यास महापालिकेकडून झोपडी रिक्त करणे संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे.

उपायुक्त कैलास गावडे
Exit mobile version