खुशखबर! पनवेल ते गोरेगाव रेल्वे सेवा सुरू

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-अंधेरी ही लोकल गाडी बुधवारी (दि.1) गोरेगाव स्थानकापर्यंत धावण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल रेल्वे स्थानकात या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून प्रवासी संघाच्या मागणीला यश आले आहे.

यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांनी सांगितले की, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम मुंबईतील उपनगरांची जोडणी या रेल्वे फेर्‍यांमुळे सुकर होणार आहे. पनवेलहुन गोरेगाव, बोरिवली यासह पश्‍चिम मुंबई नोकरी, व्यावसायासाठी जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे पनवेल-गोरेगाव या नव्याने सुरू झालेल्या गाडीमुळे प्रवाशांना अत्यंत सोयीचे होणार आहे. बोरिवली स्थानकात हार्बर रेल्वेसाठी एक प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात काम पूर्ण झाल्यावर गाड्याही वाढतील व पनवेल-बोरिवली फेर्‍या सुरू होतील या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाकडे प्रवासी संघाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.

यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष व रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. भक्तीकुमार दवे, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील, श्रीकांत बापट, सुदाम पाटील, जेष्ठ पत्रकार विजय कडू, भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव सय्यद अकबर, पत्रकार, प्रवासी यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ही गाडी पहिल्या टप्प्यामध्ये पनवेल- गोरेगाव मार्गावर धावणार असून दुसर्‍या टप्प्यामध्ये बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रवासी संघाचा पाठपुरावा सुरू आहे.

Exit mobile version