| पनवेल | वार्ताहर |
मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकाची ‘स्वच्छ स्थानक’ म्हणून निवड केली असून या स्थानकाचा नुकताच गौरव केला. 148 विविध स्थानकांमध्ये ‘अ’ दर्जा असलेल्या पनवेल स्थानकाने सर्वाधिक स्वच्छतेचा 2023 या वर्षाचा फिरते मानचिन्ह पटकावून अव्वल क्रमांक पटकावला.
2022 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छतेचे चषक पनवेल स्थानकाला मिळाले होते. 2023 मध्ये प्रशासनाने केलेल्या अधिकच्या लक्षवेधी कामामुळे स्थानकाने स्वच्छतेचे पारितोषिक पटकाविले. पनवेलचे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुनील खळदे यांनी स्थानक मास्तर जगदीश प्रसाद मिना यांची भेट घेऊन त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.
एक लाख 10 हजारांहून अधिक जण दररोज पनवेल स्थानकातून प्रवास करतात. तसेच या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांकडून महिन्याला साडेसात कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न तिकीट विक्रीतून रेल्वेच्या तिजोरीत जमा होते. सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या स्थानकांपैकी पनवेल हे एक स्थानक आहे. या स्थानकामध्ये 16 स्वच्छतागृहे, 39 शौचालये आहेत. तीनही पाळ्यांमध्ये कंत्राटी कामगार या स्वच्छतागृह आणि शौचालयांची स्वच्छता करतात. स्थानक स्वच्छतेसाठी 37 सफाई कर्मचारी काम करतात. या स्थानकात स्वच्छतेची विशेष काळजी घेतल्याने स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे.