पनवेल अर्बन बँक निवडणूकः मविआचा विजय;भाजपला दणका

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय संपादित केला आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आगामी काळात होणार्‍या सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मोठा बुस्टर डोस या विजयाने मिळाला आहे.

रविवारी (दि.27) पनवेल येथे मतदान घेण्यात आले होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महावीर यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मतमोजणीमध्ये पहिल्यापासूनच महाविकास आघाडीच सर्व उमेदवार आघाडीवर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालाजी वाघमारे यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवारांना मिळालेली मते
सर्वसाधारण विभाग- दिलीप शंकर कदम (3271), अनिल जनार्दन केणी (3225), राजेश लक्ष्मण खाणावकर ( 3123), प्रवीण पोपटराव जाधव( 3150) , जनार्दन पांडुरंग पाटील (3308) , ज्ञानेश्‍वर धोंडू बडे( 3182) , बी पी म्हात्रे 3282), हितेन बिहारीलाल शहा (3176) , महिला विभाग- विमल मल्लिनाथ गायकवाड ( 3627), विद्या भास्कर चव्हाण (3612) , अनुसूचित जाती – अरविंद सावळेकर (3809), भटक्या विमुक्त जात- भागीवंत पांडुरंग बंडू (3755), इतर मागासवर्ग- बाबुराव हरिभाऊ पालकर( 3469)

विजयी उमेदवारांमध्ये शेकापचे सात, उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे दोन, काँग्रेस तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक असे एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. तर भाजपने उत्कर्ष पॅनलमधून 13 उमेदवार उभे केले होते.

या मतमोजणी वेळेस सकाळपासूनच या निवडणुकीत आ.बाळाराम पाटील, शिवसेना नेते बबन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, काँग्रेस नेते आर.सी.घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, संघटक शशिकांत डोंगरे, महिला आघाडीच्या अर्चना कुळकर्णी, उपशहर संघटीका उज्वला गावडे, सुनंदा पाटील, मा.नगरसेविका प्रिती जॉर्ज-म्हात्रे, माधुरी गोसावी, शशिकला सिंह, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, शहरप्रमुख यतीन देशमुख, सदानंद शिर्के, हेमराज म्हात्रे, लतिफ शेख आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्यावतीने जोरदार आतषबाजी करुन गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.आगामी काळात होणार्‍या सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मोठा बुस्टर डोस मिळाल्याची प्रतिक्रिया मान्यवरानी व्यक्त केली. यापुढेही ही आघाडी अभेद्य राहील, असा दावाही नेतेमंडळींनी केला.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा विजय प्राप्त झाला आहे. हा विजय म्हणजे इथून पुढे येणार्‍या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूकीच्या या सर्वांच्या विजयाचे सुरुवात आहे. तसेच भाजपने साम-दाम-दंड या तिन्ही गोष्टीचा वापर केला तरीही त्यांना सभासदांनी नाकारले आहे. येत्या पाच वर्षात पनवेल अर्बन बँकेची उलाढाल 180 कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. विजयाचे श्रेय या पनवेल अर्बन बँकेच्या सुज्ञ मतदारांसह मेहनत घेणार्‍या आमच्या कार्यकर्त्यांचे आहे.

आ.बाळाराम पाटील

ही निवडणूक म्हणजे आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या विजयाची नांदी असून आगामी सर्व निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवून भाजपला धुळ चारणार आहे.

बबनदादा पाटील, शिवसेना नेते
Exit mobile version