शेकापचा आंदोलनाचा इशारा
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल-वलप रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पाच दिवसाच्या आत कामाला सुरुवात केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या माजी नगरसेविका प्रज्योती प्रकाश म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
पनवेल-वलप रस्ता टेंभोडे गावासमोर तसेच पाले बुद्रुक आणि गणेशनगर गावाजवळचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. येथून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, अनेक अपघातदेखील होत आहेत. याचा त्रास रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. तळोजा एमआयडीसीला शॉर्टकट म्हणून तळोजात जाणारे अनेक कामगार या रस्त्याचा वापर करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची दुर्दशा झाल्याने त्याचा त्रास त्यांना होत आहे. पाच दिवसाच्या आत कामाला सुरुवात करावी आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे प्रज्योती प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका, शेकाप यांनी केली आहे.
रस्त्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नागरिकांची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील खड्डे भरण्यासाठी त्यांना सूचित केले. रस्त्याचे पॅचेस सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. काही दिवसात कामाला सुरुवात होणार आहे.
– प्रज्योती म्हात्रे, माजी नगरसेविका







