| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल-वावंजे रस्त्याचे मे 2025 मध्ये करण्यात आलेले नूतनीकरण केवळ दोन महिन्यांत पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन खराब झाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. टेंभोडे व पाले बुद्रुक परिसरात डांबरी रस्ता अक्षरशः वितळल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले. या कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत असून, संबंधित ठेकेदाराने काम नियमबाह्य केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर वळवली येथील नागरिक विश्वास पेटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, भिंगारी (पनवेल), तसेच संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी रस्त्याची झालेली दुरवस्था, कामाचा अल्पकालीन दर्जा आणि शासनाच्या निधीचा झालेला अपव्यय याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वावंजे रस्त्यावरील टेंभोडे आणि पाले बुद्रुक परिसरातील भाग काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ठेकेदाराला केवळ 10 टक्के रक्कमच अदा करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. तथापि, या भागात सध्या सुरू असलेले पॅचवर्क काँक्रिटीकरणाच्या वेळी पुन्हा उखडले जाणार असल्याने जनतेच्या पैशाची नासधूस होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.







