वायू प्रदूषणामुळे पनवेलकर हैराण

संबंधित कारखान्यांवर कारवाई करा; शेकापची मागणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
रात्रीच्या वेळी होत असलेल्या वायू प्रदूषणामुळे पनवेलकर सध्या हैराण आहेत. रसायनिक कारखान्यात केल्या जात असलेल्या प्रक्रियेदरम्यान सोडण्यात येणार्‍या वायुमुळे हे प्रदूषण होत असल्याचा आरोप केला जात असून, प्रदूषणास जबाबदार कारखानदारांचा शोध घेऊन महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंतिध कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केली आहे.

खारघर, रोडपाली, कळंबोली, तळोजा वसाहत तसेच तळोजा परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांकरिता प्रदूषण हा विषय नवीन नाही. मागील अनेक वर्षे येथील रहिवासी प्रदूषणाचा सामना करत आहेत. प्रदूषणामुळे अनेकांना विविध आजरांचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्र जवळच असल्याने परिसरात होत असलेल्या प्रदूषणासाठी तळोजा औद्योगिक क्षेत्राला जबाबदार धरण्यात येत आहे. शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषणाचा हा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादात दाखल केला आहे. म्हात्रे यांच्या याचिकेची दखल घेत लावादाकडून ओढण्यात आलेल्या ताशेर्‍यानंतर एमपीसीबीकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळे काही प्रमाणात प्रदूषण नियंत्रणात आले असल्याचे बोलले जात असताना तळोजा औद्योगिक वसाहतीपासून जवळपास आठ ते दहा किलोमीटर दूर असलेल्या पनवेल शहरातील नागरिकांना आता प्रदूषणाची झळ बसू लागल्याने शहरात होत असलेल्या प्रदूषणास जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटमधील कारखान्यांतून प्रदूषण होत असल्याचा आरोप
पनवेल शहरालगत पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट ही छोटी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहती मधील काही कारखाने रात्रीच्या वेळी एकत्रितरित्या वायू प्रदूषण करत असल्याने पनवेलकरांना हा त्रास होत असल्याचा आरोप पनवेलमधील काही नागरिक करत आहेत.

पाळीव प्राणीही त्रस्त
रात्रीच्या सुमारास होणार्‍या या त्रासामुळे पाळीव प्राणीही त्रस्त असल्याची माहिती चेतन जोशी यांनी दिली आहे. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपासून वाढत असलेल्या या तीव्र वासामुळे डोकेदुखी, मळमळणे असे त्रास जाणवत आहेत.

रात्रीच्या वेळी होत असलेल्या प्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. लहान मुलांनादेखील याचा त्रास होत असून, डोकेदुखी, मळमळणे, उलट्या होणे अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे.

अ‍ॅड. शीतल कोळी, नागरिक, पनवेल शहर
Exit mobile version