पनवेलकरांनो सावधान पाणी जपून वापरा

आतापासूनच कपात; सहा महिने झळ बसणार

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरात आता आठवड्यातून एकदा पाणीकपात केली जाणार आहे. मजीप्रा आणि एमआयडीसीकडून वारंवार शटडाऊन घेतला जात असल्यामुळे पनवेलकरांना अगोदरच पाणीटंचाई जाणवते आहे. त्यात आता पुढील सहा महिने ही पाणीकपात सुरू राहणार असल्याने नागरिकांना मनस्ताप होणार आहे. सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ नियोजनाने शहरवासियांना आतापासूनच पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.

पनवेल शहरात पूर्वीच्या नगरपालिका क्षेत्रात महापालिकेचे देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या तीन वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला दररोज 30 ते 32 एमएलडी पाण्याची गरज आहे. महापालिकेला दररोज मजीप्राकडून 15 आणि एमआयडीसीकडून 5 एमएलडी पाणी विकत घ्यावे लागते. उर्वरित 10 ते 12 एमएलडी पाणी महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून घेतले जाते. दर महिन्याला 50 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे पाणी विकत घेणार्‍या प्रशासनाला उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याची कसरत करावी लागते.

मागील काही वर्षांपासून पनवेल महापालिका पाण्याचे नियोजन करण्यासाठी 15 जूनपर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीकपात करतात. मात्र दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच केली जाणारी पाणीकपात यंदा डिसेंबरपासूनच करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेने जाहीर सूचना देऊन पनवेल शहरामध्ये जलकुंभनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

पनवेल शहरातील सर्व्हिस हौद, भाजी मार्केट, मार्केट यार्ड, पटेल मोहल्ला, ठाणा नाका, उंच जलकुंभ, हरिओम नगर, बायपास आदी ठिकाणांहून वेगवगळ्या भागांत पाणीपुरवठा केला जातो. मजीप्रा आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या न्हावाशेवा पाणीपुरवठा टप्पा 3 योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कामामुळे वारंवार इलेक्ट्रिक शटडाऊन आणि ब्रेकडाऊन घेतले जातात. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. सुमारे 18 एमएलडी पाण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेल्या महापालिकेला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे यंदाही पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे नोकरदार महिलावर्गांना नाहक त्रास होणार आहे तसेच अनेक सोसायट्यांमधील पाणी सोडण्याचे वेळापत्रक बदलणार आहे. यातूनच सोसायटयांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपचे अपयश
पाच वर्षापूर्वी पनवेल मनपाची सत्ता मिळविताना शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. त्यावेळी राज्यात भाजपचीच सत्ता होती. तरीही पाच वर्षात पनवेलमध्ये ठोस पाणीपुरवठा योजना राबविण्यात पनवेल भाजपला यश आलेच नाही. उलट दरवर्षी देहरंग धरणातील गाळ काढून कशीबशी तहान भागविण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केले. आता तर पनवेल मनपाची मुदत संपुष्टात आली आहे. तेथे सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे पनवेलचा पाणीप्रश्‍न सध्या तरी सुटणे अशक्य आहे. निवडणुका झाल्यावरच याबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे. तोपर्यंत पनवेलच्या सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की.

Exit mobile version