ट्विटरची मालकी मिळताच पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

। मुंबई । वृत्तसंस्था ।

ट्विटरचा बहुचर्चित ठरलेला करार अखेर पूर्ण झाला आहे. 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवहारावर मस्क यांनी अखेर शिक्कामोर्तब केला आहे. यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘टेस्ला’चे मालक एलॉन मस्क हे ट्विटर कंपनी नवे मालक बनले आहेत.

ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या तीन टॉप अधिकाऱ्यांना कंपनीतून हटवलं आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. इतकंच नाही तर सीएफओ नेद सेगल, लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांना तातडीनं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवरील फेक अकाऊंटबाबत मस्क आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असा ठपका ठेवत ह्या तीन अधिकाऱ्यांना हटवण्यात आल्याच सांगितलं जात आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर फक्त सीईओ पराग अग्रवालच नाही तर अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यावर एलॉन मस्क 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे.

Exit mobile version