कर्जत । वार्ताहर ।
कर्जतचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराषट्रीय कला-संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत.
तसेच बोरसे यांच्या एका चित्राची निवड चीनमध्ये होणार्या चित्र प्रदेशांसाठी केली आहे. जगातील नामांकित 50 चित्रकारांची चित्रे या प्रदेशांत मांडण्यात आली होती. अमेरिकेत सलग दोन वर्षे चित्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या पराग बोरसे या मराठमोळ्या चित्रकाराच्या चित्रांना चीनमध्ये बोलावून घेतल्याने त्यांच्या चित्रांना चायनामेडचे गोंदण मिळाले. बोरसे यांच्या याच चित्राला यापूर्वीही पेस्टल जरनल अमेरिकेच्या मॅगझीनने व्यक्ती चित्रणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या चित्रांना परदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच अनेक चित्रे परदेशातील ख्यातनाम मासिकांमध्ये प्रसिद्ध होऊन त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. बोरसे यांनी कर्जत मधील अनेक उदयोन्मुख चित्रकारांना मार्गदर्शन केले आहे. त्या चित्रकारांची चित्रेही साता समुद्रापार गेली आहेत.