। परभणी । प्रतिनिधी ।
परभणीमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेची प्रत ठेवली आहे. मंगळवारी संध्याकाळी माथेफिरूने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. जमावाने त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु या घटनेमुळे पराभणीत बुधवारी (दि. 11) बंद पुकारण्यात आला. मात्र, या बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले.
परभणीत बुधवारी आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली. मंगळवारी सांयकाळी रस्ता रोको, रेल रोको आंदोलन केल्यानंतर बुधवारी सकाळ बंद पुकारण्यात आला. शांततेत बंद सुरू असताना अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे इंटरनेट सेवाही स्थगित केल्याचे वृत्त आहे. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर, काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. अखेर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.