राज्य अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात परभणी तर किशोरी गटात सांगली विजेते

। परभणी । प्रतिनिधी ।
यजमान परभणी आणि सांगली यांनी 32 व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. दोन्ही अंतिम सामने शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळले गेले. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत संपन्न झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात परभणीने नंदूरबाचे कडवे आव्हान 30-25 असे परतवून लावत प्रभाकर नागु पाटील चषकावर आपले नाव कोरले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत नंदूरबारने शेवटच्या काही मिनिटापर्यंत आपल्याकडे आघाडी टिकवण्यात यश मिळविले होत. पण शेवटी त्यांचा संयम सुटला आणि नंदूरबारला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या क्षणी त्यांच्यावर पडलेल्या लोणमुळे देखील ते पराभवाच्या गर्तेत गेले. तर मुलींच्या अंतिम सामन्यात सांगलीने अतिशय चुरशीच्या लढतीत पुण्याचा प्रतिकार 26-24 असा मोडून काढत चंदन पांडे फिरता चषक आपल्या नावे केला. एका तपाच्या कालावधीनंतर सांगलीने किशोरी गटात ही किमया साधली. या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने कोल्हापूरला 39-27 असे, तर नंदुरबारने सांगलीचा 34-33 असे चकवीत अंतिम फेरीत धडक दिली. मुलींच्या उपांत्य फेरीत पुण्याने कोल्हापूरचा 46-30 असे, तर सांगलीने मुंबई उपनगरला 21-18 असे नमवित अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण परभणीच्या जिल्हाधिकारी आचाल गोयल, परभणीच्या जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा भावना नखाते, परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

Exit mobile version