। परभणी । प्रतिनिधी ।
यजमान परभणीसह पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याच्या संघांनी 32व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटात बाद फेरी गाठली. तर सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी किशोरी आणि सातारा, जालना नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली व जळगाव यांनी देखील किशोर गटात बाद फेरीत प्रवेश केला.
परभणी-पाथरी येथील कबड्डी महर्षी बुवा साळवी क्रीडागरीत सुरू असलेल्या मुलींच्या इ गटात ठाण्याने रत्नागिरीला 30-28 असे चकवित या गटात अग्रक्रम पटकाविला. तर रत्नागिरीने उपविजयी होत बाद फेरी गाठली. द गटात कोल्हापूरने सातार्याला 34-30 असे पराभूत करीत उपविजयी म्हणून बाद फेरी गाठली. रायगडने सोलापूरला 47-47 असे बरोबरीत रोखल्यामुळे या दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली. फ गटात नाशिकने सिंधुदुर्गला 59-18 असे पराभूत करून या गटात अव्वल स्थान मिळवीत बाद फेरी गाठली. सिंधुदुर्ग देखील उपविजयी ठरले.
मुलांच्या ड गटात नंदुरबारने मुंबई उपनगरला 45-30असे पराभूत केले. इ गटात कोल्हापूरने औरंगाबादला 36-32 असे पराभूत करीत बाद फेरी गाठली. फ गटात अहमदनगरने सांगलीला बरोबरीत रोखत बाद फेरीतील आपला मार्ग सुकर केला. अ गटात सातार्याने ठाण्याला 55-20असे नमवित या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ब गटात पुण्याने श्रीधर कदम, यश करपे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सिंधुदुर्गला 47-17 असे नमवले.