परभणी दगडफेक प्रकरण; तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू

| परभणी | वृत्तसंस्था |

परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी संशयाचे वातावरण तयार झाले असून आंबेडकरी व संविधानवादी जनतेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

या महाराष्ट्र बंदला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही पाठिंबा दर्शवलाय. या प्रकरणात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केलीये. या प्रकरणामुळे परभणीत वातावरण तापण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. याबाबत अंबादास दानवे म्हणाले, दलित संघटना उद्या बंद पुकारात आहेत. त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत. यासंदर्भात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली. परभणीत झालेल्या घटनेनंतर 16 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे व्हावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी, अमानुष अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी, शाहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, या मागण्या सरकारसमोर केल्या जाणार आहेत.

सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये केले जावे आणि फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण केले जावे. याबरोबरच आम्ही न्यायासाठी लढू! असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version