| वावोशी | प्रतिनिधी |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने ‘लाईट ऑफ लाईफ’ संस्थेच्या पालक मेळाव्यात बुवाबाजी, अंगात येणे आणि चमत्कारामागील विज्ञान या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. समाजात वाढत चाललेल्या तथाकथित आध्यात्मिक बुवाबाजीच्या पार्श्वभूमीवर या विषयाची चिकित्सक मांडणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुवाबाजी व आध्यात्मिक बुवाबाजी यामधील फसवणुकीचे स्वरूप स्पष्ट करत काही चर्चित बाबांच्या उदाहरणांच्या माध्यमातून अशा व्यक्ती लोकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण कशाप्रकारे करतात याचे विश्लेषण करण्यात आले. अंधश्रद्धेच्या आडून निर्माण होणारी भीती, श्रद्धेचा गैरवापर आणि भावनिक कमकुवतपणाचा कसा फायदा घेतला जातो यावर प्रकाश टाकण्यात आला. यानंतर मन या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माणसाचे मन नेमके कोठे असते, मन आजारी पडते म्हणजे काय होते, मनाचे विविध प्रकार कोणते, तसेच ङ्गअंगात येणेफ या समजुतीमागील मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणमीमांसा काय आहे, याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण करण्यात आले. विशेषतः अंगात येण्याच्या घटना स्त्रियांमध्येच अधिक का आढळतात, त्यामागील सामाजिक दबाव, दडपण आणि भावनिक अभिव्यक्तीची कमतरता यांचा संबंध स्पष्ट करण्यात आला. काही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा संदर्भ देत या प्रकारांकडे वैज्ञानिक व समजूतदार दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समस्यांवर मूलभूत उपाय म्हणून परस्परांवर प्रेम, संवाद आणि सहकार्याची भावना जोपासणे हाच प्रभावी मार्ग असल्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थित पालकांमध्ये जागर निर्माण होऊन अंधश्रद्धांविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.







