विद्यार्थी सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन
। नेरळ । प्रतिनिधी ।
पालकांनी आपली मुलं स्कूल बसमधून प्रवास करताना त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच, शाळेतून घरी परत आल्यावर मुलांशी संवाद साधला पाहिजे, असा सल्ला महिला पोलीस अधिकारी मनिषा लटपटे यांनी दिला आहे. कर्जत पंचायत समितीने पुढाकार घेऊन बदलापूर आणि आता नुकताच घडलेल्या कर्जत येथील प्रकरणानंतर पालक, शाळा प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षण विभागाचे प्रमुख यांची विद्यार्थी सुरक्षितता कार्यशाळा सोमवारी (दि.21)पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची तपास अधिकारी असून त्या गुन्ह्यात तपास करताना अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्या स्कूल बसमध्ये 25 लहान बालके प्रवास करीत होती. त्याबाबत पालकांनी खबरदारी घ्यायला हवी होती. एक वर्षापासून असे प्रकार सुरू असताना बसमध्ये सीसीटिव्ही आहेत की नाहीत, हे आपण पाहू शकलो नाही ही देखील खंत आहे. कोणत्याही स्कूल बसमध्ये जरी एक विद्यार्थीनी असली तरी त्या बसमध्ये महिला केअर टेकर असणे गरजेचे आहे. त्याची नोंद पालकांनी घ्यायला हवी होती. त्यामुळे कर्जत येथील प्रकारातून आपण धडा शिकला पाहिजे. तसेच, विद्यार्थ्यांना 112 नंबरची माहिती देऊन संकटकाळी हा नंबर डायल करायला सांगा. दहा मिनिटांत पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहचेल आणि संबंधितांना सुरक्षित ठिकाणी पोहचवू शकेल, अशा सूचना कर्जतच्या महिला सहायक पोलीस निरिक्षक मनीषा लटपटे यांनी केल्या आहेत.

तालुका शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याची जबाबदारी परिवहन समितीवर देण्यात आली आहे. तसेच, सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांशी मित्रत्वाने वागले पाहिजे. आपल्या मुलांच्या वर्तनात झालेल्या बदलांकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. पालकांनी दररोज आपल्या पाल्याशी संवाद साधला पाहिजे. त्याचप्रमाणे शाळेत आणि स्कूल बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे असल्याची खात्री करूनच मुलांना पाठवावे. जर स्कुज बसमध्ये 16 वर्षांखालील मुली असतील तर त्या ठिकाणी महिला केअर टेकर असली पाहिजे. तसेच, जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला आणि वाईट स्पर्श याचे अभियान सुरू केले जाणार असल्याचे दौंड यांनी सांगितले आहे.
यावेळी कर्जत पंचायत समिती शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्यासह कर्जतच्या महिला सहायक पोलीस मनीषा लटपटे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी देविदास जाधव, मुख्याध्यापक सतीश प्रधान, डॉ. वर्षा देशमुख, सिस्टर आमला, शिक्षण समन्वयक सुर्वे आदींसह पालक, शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्था प्रमुख आणि परिवहन समितींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिवहन ठेकेदार अनुपस्थित
कर्जत येथे घडलेला प्रकार हा स्कूल बसमध्ये घडला आहे. तसेच, त्या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याचा फायदा आरोपीने घेतला आहे. त्याला जबाबदार परिवहन ठेकेदार, स्कूल बस चालक व मालक हे आहेत. परंतु, ते या सभेला अनुपस्थित राहिले होते त्यामुळे या गुन्ह्यांत त्यांचा देखील हातभार आहे का, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होत होती.







